राहुल बोंद्रेंच्या नेतृत्वात बुलढाण्यात आत्मक्लेष आंदोलनाला सुरुवात! सिंदखेडराजा शेगाव भक्ती महामार्गा विरोधात आंदोलन पेटले..

 
Jnbsb

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मातृतीर्थ सिंदखेड राजा ते शेगाव या १०९ किलोमीटर अंतराच्या भक्ती महामार्गाला हजारो शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान, आज १ जुलै, सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात भक्ती महामार्ग बचाव कृती समितीच्या वतीने आत्मक्लेष आंदोलन सुरू झाले आहे. शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असून तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे. शासनाने तातडीने हा महामार्ग रद्द करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली जात आहे. आंदोलन सुरू होताच, पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. 

  सध्या राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होत आहे. शासनप्रस्तावित सिंदखेडराजा शेगाव या भक्ती महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाऊ व कसदार जमीनी अधिग्रहित केल्यास जगाच्या पोशिंद्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. सिंदखेड राजा ते शेगाव जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. परंतु काही मिनिटे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित होणे चुकीचे आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा महामार्ग रद्द करण्यात यावा असे राहुल बोंद्रे म्हणाले.