स्वयंसहाय्यता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर! उपसाधने पुरवठा योजनेसाठी असे करा अर्ज....

 
Bcbcb
बुलडाणा(जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या सर्व स्वयंसहाय्यता बचत गटांना 3.50 लक्ष रुपयांच्या मर्यादेत 9 ते 18 अश्वाशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयानुसार त्यांना अर्थसहाय्य करण्यात येत आहे. त्यासाठी स्वयंसहायता बच गटांनी 31 जानेवारीपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  
वस्तू स्वरुपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याबाबतचा नियोजन विभागाने शासन निर्णय दिला आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
   संबंधित वस्तूंबाबत वितरण योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 3.50 लाखाच्या मर्यादेत (90 टक्के शासन अनुदान व 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गट हिस्सा) 9 ते 18 अश्वणशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिवेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर) खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुज्ञेय असणाऱ्या अनुदानाच्या रकमेपेक्षा उपसाधनांची किंमत जास्त असल्यास कमाल अनुज्ञेय अनुदानाव्यतिरीक्त जादाची रक्कम बचत गटांना स्वत: खर्च करावी लागेल. 
 
 या योजनेंतर्गत लाभार्थींची निवड झाल्यानंतर बचत गटाने कृषि आणि शेतकरी कल्याण विभाग, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने निर्धारीत केलेल्या प्रमाणकानुसार मान्यताप्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारीत केलेल्या किंमतीपर्यंत खरेदी करावीत. स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर शासकीय अनुदानाचा 50 टक्के हप्ता आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरीत 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर जमा करण्यात येईल किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यास 100 टक्के अनदान खात्यात जमा करण्यात येईल.
   
 निर्धारीत केल्याप्रमाणे 9 ते 18 अश्व शक्तीच्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची कमाल किंमत 3.50 लाख ठरविण्यात आली आहे. या रक्कमेपैकी अनुदानाची रक्कम कमाल किंमतीच्या 90 टक्के (3.15 लाख) राहील. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्य व अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. त्यातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.50 लाख रुपये राहील तर स्वयंसहाय्यता बचत गटांनी 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
तरी इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी विहित नमुन्यामध्ये 31 जानेवारीपर्यंत आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चिखली रोड, त्रिशरण चौक, बुलढाणा येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.