जिल्ह्यात ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद! पुन्हा ऑनलाइन वर्ग; पहिली ते आठवीचा समावेश, ९ ते १२ वीचे वर्ग मात्र सुरूच राहणार

 
file photo
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा लाइव्हने केलेल्या भाकिताप्रमाणे कोरोना व ओमिक्रॉनची धास्ती आणि त्याच्या प्रसाराची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्गाचे अध्ययन ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. मात्र ९ वी ते १२ वीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीनेच सुरू राहणार आहे.

जिल्हा प्रशासनाने आज, ७ जानेवारीला संध्याकाळो यासंदर्भातील आदेश निर्गमित केले. यानुसार शहरी, ग्रामीण भागातील शासकीय, खासगी  शाळांना हा आदेश लागू राहणार आहे. यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांचे अध्ययन किमान ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीनेच सुरू राहणार आहे. पुढील परिस्थिती लक्षात घेऊन ३१ तारखेला पुढील आदेश काढण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सक्त निर्देश...
दरम्यान, ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला सक्त निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. या वर्गातील १५ ते १८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे लागणार आहे. तसेच त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागणार आहे. तसेच शाळेत प्रवेश करताना थर्मल गनद्वारे तपासणी करावी लागणार आहे. याशिवाय मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे लागेल. सर्व शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे.