अमोना गावातील शाळा बंद आंदोलनाला यश! २२ फेब्रुवारीपर्यंत होणार शिक्षकांची नियुक्ती!

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: ऋषी भोपळे) :शिक्षकांच्या मागणीसाठी 
अमोना गावात मागील दोन दिवसांपासून 'शाळा बंद' आंदोलन सुरू होते. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा अमोना येथील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने हे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला यश मिळाले असून २२ फेब्रुवारी पर्यंत शाळेत ३ शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चिखली यांनी शाळा व्यवस्थापन समितीला पत्र दिले आहे.
   जिल्हा परिषदेच्या या शाळेची १८१ इतकी पटसंख्या आहे. त्यानुसार ९ शिक्षकांची मान्यता मिळाली. परंतु आंदोलानापूर्वी शाळेला ६ शिक्षक कार्यरत होते. दरम्यानच शाळा समितीसह ग्रामस्थ पालकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी वेळोवेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली होती. मात्र दखल घेण्यात आली नाही म्हणून शाळा समितीने 'शाळा बंद' आंदोलन छेडले. काल शुक्रवारी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी आंदोलनाला भेट देऊन एका शिक्षकाला रुजू करण्यात आल्याचे सांगितले. मात्र पूर्ण तीन शिक्षक मिळावे यासाठी आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले. पुढे २२ फेब्रुवारी पर्यंत तिन्ही शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल असे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्या स्वाक्षरीचे पत्र शाळा समितीला प्राप्त झाले. त्यामुळे शाळा समितीने आंदोलन मागे घेतले. आंदोलनाला यश मिळाल्याने शाळा समिती ,ग्रामस्थ ,विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.