सावट ओमिक्रॉनचे... जिल्ह्यात प्रमुख अधिकारी रजेवर असल्याने प्रभारींची कसरत!; LCB प्रमुखही बाधित!!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. ओमिक्रॉनचाही तिसरा रुग्ण जिल्ह्यात आढळला आहे... त्‍यामुळे आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून, बिकट परिस्थिती उद्‌भवलीच तर ती कशी हाताळायची यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र हे करण्यासाठी प्रमुख अधिकारी नसून, प्रभारींचीच तारेवरची कसरत होत आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा शल्य चिकित्‍सक नितीन तडस आणि पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हे प्रमुख अधिकारी रजेवर आहेत.

जिल्हाधिकारी १७ जानेवारीपर्यंत रजेवर गेल्याने त्‍यांचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे आला आहे. जिल्हा शल्य चिकित्‍सक १६ जानेवारीपर्यंत रजेवर असून, त्‍यांचा प्रभार निवासी जिल्हा शल्य चिकित्‍सक डॉ. भागवत भुसारी सांभाळत आहेत, तर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना कोरोना झाल्याने त्‍यांचा पदभार अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्याकडे आहे. याशिवाय बुलडाणा शहराचे ठाणेदार प्रदीप साळुंखे निवृत्त झाल्याने त्‍यांचा पदभार गिरिश ताथोड पाहत आहेत. प्रभारींवरच सध्या परिस्‍थितीचा मोठा ताण दिसून येत आहे.

एलसीबी पीआय बळीराम गीतेंनाही कोरोना
बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. सर्दी, खोकला आणि अंगात कणकण जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली असता त्याचा अहवाल काल, ९ डिसेंबर रोजी पॉझिटिव्‍ह आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांचा अहवालसुद्धा पाच दिवसांपूर्वी पॉझिटिव्‍ह आला होता. ते सध्या त्यांच्या निवासस्थानीच उपचार घेत आहेत. त्यानंतर काल श्री. गीते यांचा अहवाल सुद्धा आज पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याची धुरा सांभाळरणारे दोन अधिकारी बाधित झाले आहेत. श्री. गीते हेही सध्या  त्यांच्या निवासस्थानीच उपचार घेत आहेत. गेल्या तीन- चार दिवसांत संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन श्री गीते यांनी केले आहे.