ग्रामसेवकाच्या विरोधात सारशिवच्या सरपंच बुलडाण्यात!

जिल्हा परिषदेसमोर सुरू केले उपोषण
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावात विकासकामे खोळंबली आहेत. ग्रामसेवक काहीच काम करत नाही. त्‍यांना अधिकारीही पाठिशी घालत आहेत, असा आरोप करत सारशिवच्या सरपंच सौ. रमाबाई दादाराव जाधव या बुलडाण्यात जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्‍यांनी निवेदन दिले असून, निवेदनात म्‍हटले आहे, गट विकास अधिकारी आशिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सारशिव ग्रामपंचायतीवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात यावा. मेहकर पंचायत समितीतील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. २०१५ ते २०२० दरम्‍यानच्या काळात सरपंचांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी. गैरव्यवहार समोर आणल्याने राग मनात धरून पंचायत समितीच्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी आशिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सारशिव ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे गावाच्या विकासकामांना खिळ बसली आहे. ग्रामसेवक सुध्दा काहीच काम करत नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत आहे, असे सौ.रमाबाई जाधव यांनी निवेदनात म्‍हटले आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्‍त केला आहे.