सरनाईक आणि राजपुतांची प्रकृती खालावली! चिखलीतील अन्नत्याग आंदोलन चिघळण्याची शक्यता; रविकांत तुपकर म्हणाले, प्रशासन बघ्याची भूमिका घेत असेल तर.....

 

चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांचे चिखलीत तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. अन्नाचा एक कण देखील आंदोलनकर्त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे सरनाईक आणि राजपूत यांची तब्येत खालावली आहे. काल, आंदोलन स्थळी शेतकऱ्याने ते रविकांत तुपकर यांनी भेट दिली. प्रशासन जर बघायची भूमिका घेत असेल तर मात्र आम्हाला आंदोलनात सहभागी व्हावे लागेल असा इशारा तुपकर यांनी दिल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भक्ती महामार्ग रद्द करावा, पिक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम तातडीने मिळावी यासह इतर मागण्या घेऊन सरनाईक आणि नितीन राजपूत यांचे चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. चिखली तालुक्यातील गावा गावातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होताना दिसत असून सरनाईक आणि राजपूत यांना समर्थन देत आहेत. आज सकाळी रविकांत तुपकर यांनी फेसबुक वर येऊन सरकारची पोलखोल केली.
काल मंत्रालयात पिक विमा संदर्भात झालेल्या बैठकीवरही तुपकर यांनी भाष्य केले. सरकारने ३१ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होईल असे सांगितले असले तरी सरकारने आतापर्यंत अशा घोषणा कितीतरी वेळेस केल्या असून तारीख पे तारीख असे सरकारचे धोरण असल्याची टीका तुपकर यांनी केली , शिवाय चिखली येथील आंदोलनाकडे जर प्रशासन दुर्लक्ष करीत असेल, शेतकरी पुत्रांच्या मरण्याची वाट पाहत असेल तर मात्र आम्हालादेखील या आंदोलनात सहभागी व्हावे लागेल असा खणखणीत इशारा तुपकर यांनी दिला आहे. त्यामुळे चिखली येथील हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.