'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील बुलढाण्यात! म्हणाले...
Updated: May 23, 2024, 09:08 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) होय! बातमीच जे हेडिंग तुम्ही वाचलयं ते अगदी खरंय..काल बुलढाण्यात मनोज जरांगे पाटील अवतरल्याचा भास अनेकांना जाणवला. शहरातील कृष्णा हॉटेल परिसरात हुबेहूब जरांगे पाटलांसारखे दिसणारे अभिनेते रोहन पाटील यांना पाहून जांभरुण रोड रस्त्यावरील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला...मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष मांडणारा 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट २१ जुनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. याअनुषंगाने चित्रपटाच्या प्रचारा निमित्त संघर्ष योद्धा टीम बुलढाण्यात पोहोचली. येथील कृष्णा हॉटेल, छत्रपती टॉवर इमारतीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारे अभिनेते रोहन पाटील आणि दिग्दर्शक, लेखक गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाविषयी माहिती विषद केली. त्यांच्यासह बालकलाकार श्रीनिवास पोफळे याची देखील विशेष उपस्थिती होती. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन प्रवास, अलीकडे आरक्षणाविषयी पेटलेले राज्य आणि राज्य सरकारची भूमिका असे एकंदरीत दृश्य चित्रपटात दाखवण्यात आले आहे. जरांगे पाटलांचा संघर्षाची प्रेरणा समाजातील प्रत्येक माणसाने घ्यावी या हेतूने चित्रपट निर्माण करण्यात आला आहे, मराठा समाजातील बांधवांनीच नव्हे तर विरोधकांनी सुद्धा 'संघर्षयोद्धा' चित्रपट बघावा असे आवाहन जरांगे पाटलांची भूमिका साकारणारे अभिनेता रोहन पाटील यांनी केले. त्यांनी केलेला पेहराव, दाढी, केस, हातवारे बघून प्रत्यक्ष मनोज जरांगे असल्याचा भास उपस्थितांना जाणवला.