बालाजी सोसे यांच्या आंदोलनास संदीप शेळकेंचा पाठिंबा !शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची शासनाकडे केली मागणी

 

सिंदखेड राजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पळसखेड चक्का  येथील बालाजी सोसे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा  वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासह इतर मागण्यांसाठी बालाजी सोसे यांनी १० डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. मात्र शासनाचे या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाले आहे. संदीप शेळके यांनी १३ डिसेंबर रोजी या आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना पाठबळ दिले पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्या मागण्या रास्त असून शासनाने त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

बालाजी सोसे यांच्या नेतृत्वातील उपोषणाला सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा, आपल्या एकीचे बळ शासनाला दाखवावे. शेतकरी एका दाण्याचे हजार दाणे उगवतो. घामाच्या जोरावर शेती पिकवतो. शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. वेळीच त्यांच्या मागण्या मान्य कराव्या. वन बुलढाणा मिशन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचे संदीप शेळके यांनी सांगितले.