ग्रामीण भागातुन कुस्तीपटू तयार व्हावे- संदीप शेळके यांचे प्रतिपादन! बायगावात पार पडली कुस्त्यांची दंगल; महिला कुस्तीपटूंचाही सहभाग

 
sandeep shelke

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शारीरिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. कुस्ती हा  मातीशी नाळ जुळलेला खेळ आहे. विशेषतः ग्रामीण भागात कुस्ती हा खेळ जास्त खेळला जातो. ग्रामीण भागातून कुस्तीपटू तयार व्हावे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.

देऊळगाव मही नजीकच्या बायगाव येथे ७ एप्रिल रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच दिनकराव जायभाये, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर काकड, तंटामुक्ती अध्यक्ष जगन पाटील, पीएसआय प्रताप जाधव, श्रीराम पालवे, माजी पोलीस पाटील रामदास नागरे, गणेश नागरे, रामा पाटील,निवृत्त पोलीस उपअधीक्षक गजानन जायभाये, श्रीराम पालवे, माजी सरपंच एकनाथ जायभाये, श्रीकांत जायभाये, गणेश पालवे, विजय खर्डे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना संदीप शेळके म्हणाले, आजही अनेक खेड्यांमध्ये कुस्तीच्या स्पर्धा होतात. यात्रेच्या निमित्ताने किंवा इतर कारणाने कुस्तीची परंपरा जोपासली जाते. बायगाववासी  दरवर्षी कुस्तीची स्पर्धा आयोजित करतात. यानिमित्ताने गावात कुस्तीचा माहोल तयार होतो. परिसरातील पैलवानांना संधी मिळते. 

महिला कुस्तीपटूंनी वेधले लक्ष

बायगाव येथील कुस्ती स्पर्धेसाठी दुरदुरुन पैलवान आले होते. विशेष म्हणजे महिला कुस्तीपटू सुद्धा सहभागी झाल्या. सोनाली गिरगे, विशाखा चव्हाण, संजीवनी चव्हाण या युवा कुस्तीपटूंनी आपल्या खेळातून सर्वांचे लक्ष वेधले. त्यांची कुस्ती पाहून सर्वांना दंगल चित्रपट आठवला. ग्रामीण भागात महिला कुस्तीपटू तयार होत असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे संदीप शेळके म्हणाले.