सचिन कदमांचा कार्यकाळ स्मरणात राहील! चिखली गाजविणारे गुलाबराव वाघ बुलडाण्याचे नवीन "एसडीपीओ"..!

 
axcvb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र शासनाने आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तर काहींना पदोन्नती देण्यात आले. बुलडाणा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आपली छाप सोडणारे सचिन कदम यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश राज्य सरकारकडून स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. सचिन कदम यांच्य जागेवर आता उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गुलाबराव वाघ यांचे प्रमोशन झाले आहे.

  गेल्या अडीच ते ३ वर्षांच्या कार्यकाळात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सचिन कदम यांनी वेगळी छाप सोडली होती. अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा उकल करण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिला. चिखलीतील कमलेश पोपट हत्याकांड प्रकरणात आरोपींचा शोध लागेपर्यंत सचिन कदम चिखली पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. चिखली, रायपूर, बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खूनांच्या तपासात त्यांचे विशेष मार्गदर्शन स्थानिक पोलिसांना मिळाले. बुलडाण्यात आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय कुटे यांच्यातील वादाचे प्रकरण देखील तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात  व्यवस्थित हाताळले होते, त्यामुळे बुलडाणेकरांना व पोलीस कर्मचाऱ्यांना देखील सचिन कदमांचा कार्यकाळ स्मरणात राहील.

   गुलाबराव वाघांचे प्रमोशन..!

सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गृह विभागाचा पदभार सांभाळणाऱ्या गुलाबराव वाघांचे प्रमोशन झाले आहे. गुलाबराव वाघ आता बुलडाणा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम सांभाळतील. याआधी चिखली पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून गुलाबराव वाघांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. ९ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्यानंतर त्यांनी दोन दिवसांत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर सदर प्रकरणाचा वेगवान तपास करण्यात आला होता. आरोपींना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. चिखली परिसरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले होते. परिसराचा आधीच अभ्यास असल्याने त्यांची कारकीर्द देखील चांगलीच राहील असे पोलीस दलात बोलल्या जात आहे.