जिल्ह्यात सडक सुरक्षा अभियानाला सुरुवात! एसपी कडासने म्हणाले "सर सलामत तो पगडी पचास.." वाहनधारकांनी काळजी घ्यावी!

वाहतूक नियमांचे गांभीर्य ठेवा!!
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरेंचे आवाहन! 
 
Police
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):गत वर्षात अपघातातील मृतकांची संख्या ४०० पेक्षा अधिक आहे. यामध्ये अधिकतर अपघात निष्काळजीपणामुळे झाल्याचे निदर्शनातून स्पष्ट होते. त्यामुळे वाहनधारकांनी स्वतःची सुरक्षा ठेवणे गरजेचे आहे, दुचाकी धारकांनी तर हेल्मेटचा वापर नेहमी करावा असे मत बुलडाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी व्यक्त केले. तसेच नियमांचं काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी प्रसाद गाजरे यांनी वाहनधारकांना केले. काल २३ जानेवारीला रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
रस्ता सुरक्षा अभियान १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे. काल दिवसभरात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनधारकांना अपघात मुक्त करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन होते. त्यामध्ये सकाळी जनजागृती दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर वाहनधारकांची नेत्र तपासणी, त्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या इमारतीमध्ये दुपारी अभियानाला विधीवत प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंचावर पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार, मुख्याधिकारी गणेश पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनिल रिंढे यांनी केले.