समुद्रात शिवस्मारक उभारल्यापेक्षा जमिनीवर उभारा; जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात पुरुषोत्तम खेडेकरांचे विधान

 खासदार जाधव आणि पालकमंत्र्यांना म्‍हणाले, सिंदखेडराजाच्या विकासासाठी एकत्र या!; जिजाऊ जन्मोत्सव उत्‍साहात!!
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरकारने अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचे ठरवले आहे. मात्र १२ हजार कोटी रुपयांचे शिवस्मारक समुद्रात उभारणे अशक्य आहे. समुद्रात शिवस्मारक उभारण्यापेक्षा जमिनीवर उभारा, असे विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. आज, १२ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीवर आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाच्या आदेशानुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत मात्र उत्साहपूर्ण वातावरणात सिंदखेड राजा येथे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा झाला. सकाळी सहाला सूर्योदयापूर्वीच राजवाड्यात मराठा सेवा संघातर्फे जिजाऊ पूजन करण्यात आले. सकाळी नऊला जिजाऊ सृष्टीवर शिवधर्म ध्वजारोहण करण्यात आले. नऊ ते अकरादरम्यान शाहिरांच्या पोवाडे सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर जिजाऊ सृष्टीवरील सभागृहात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर होते. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, राजश्री प्रतापराव जाधव, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, संजय जाधव, संजय वायाळ, मनोज आखरे, कामाजी पवार, विजयकुमार घोगरे, मधुकर मेहकरे, माधुरीताई भदाणे यांची उपस्थिती होती. यावेळी पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, की अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचे काम अशक्य आहे. शिवस्मारक अरबी समुद्रात उभारण्यापेक्षा राजभवनात किंवा सिंदखेड राजा येथे शिवरायांच्या आजोळी उभारा. बुलडाणा, जालना व औरंगाबाद या मराठवाडा व विदर्भाच्या मध्यवर्ती ठिकाणी २०० एकर जमिनीवर शिवस्मारक करावे. खासदार संभाजी राजे भोसलेंनी सर्व भोसले एकत्र करून काही तरी करून दाखवले. त्याप्रमाणे सर्व जाधवांनी एकत्र येऊन सिंदखेड राजाच्या पर्यटनाच्या दृष्टीने काहीतरी करावे, असे खेडेकर म्हणाले.

सिंदखेड राजाच्या विकासासाठी पालकमंत्री डॉ. शिंगणे व खासदार प्रतापराव जाधव यांनी एकत्र यावे. सिंदखेड राजाच्या विकासासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून त्यांना सिंदखेडराजाला आणावे. अजितदादांनी इथले काम बघितल्यावर ते नक्कीच या भूमीला निधी देतील. सिंदखेड राजा येथे सरकारी जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे जिजाऊ सृष्टीवरील जमिनीवरच शासनाने इमारत उभी करावी व एक हजार पर्यटकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे येथील लोकांनाही रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. राज्यात सत्ता आल्यास सिंदखेड राजाला सोन्याचा मुलामा चढवेल असे बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले होते.

आता शिवसेनेचा मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे खासदार प्रतापराव जाधव आणि पालकमंत्री डॉक्टर शिंगणे यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांना भेटून जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न करावे. सिंदखेड राजा आणि जिजाऊ सृष्टीला वेगळे समजू नये. ते एकत्रच आहे, असेही यावेळी पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले. यावेळी पालकमंत्री डॉक्टर शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, कामाजी पवार, मनोज ठाकरे यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

१२

शासकीय कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी केले राजमाता जिजाऊंना अभिवादन
सकाळी सूर्योदयापूर्वीच सिंदखेड राजा येथील राजवाड्यावर कोरोना नियमांचे पालन करत राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादनाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. जिजाऊ वंदनाचे गायन यावेळी करण्यात आले. राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी काही युवक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत तर युवती आणि महिला जिजाऊंच्या वेशभूषेत आल्या होत्या. यावेळी सिंदखेड राजाचे नगराध्यक्ष सतीश तायडे, उपनगराध्यक्ष रुक्मिणीबाई तायडे, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार सुनील सावंत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केले.