महसूल कर्मचाऱ्यांनो नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक द्या! जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांच्या सूचना

 
kdfdf

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाकडून अपेक्षा आहेत. संकटाच्या वेळी हा विभाग उत्तम समन्वयाची भूमिका बजावत असतो. नागरिकांची अडचण झाल्याशिवाय यंत्रणांकडे येत नाहीत. त्यामुळे आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना सौजन्यपूर्वक वागणूक द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की,प्रशासनात महसूल विभागाची ख्याती सांगितली जाते. हा विभाग नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहे. अनंत अडचणीचा सामना करीत महसूल विभाग नागरिकांना मदत करीत असतो. नागरिकांशी संवाद अधिक वृद्धींगत व्हावा यासाठी नागरिक आणि सैनिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी हे एक व्यासपीठ आहे. याठिकाणी त्यांनी समस्या मांडाव्यात. या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी हा महत्वाचा विषय आहे. सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होण्यासाठी लवकरच आरोग्य शिबीर घेऊन आरोग्याची काळजी घेण्यात येईल.

गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील पाच तालुक्यात पूराची स्थिती निर्माण झाली होती. यामुळे समस्या निर्माण झालेले नागरिक मदतीसाठी येत आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काम करावेच लागणार आहे. त्यामुळे एक आव्हान म्हणून कर्मचाऱ्यांनी या नागरिकांना मदत करावी. यातून एक चांगला परिपाठ आपल्याला मिळेल, असेही जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी सांगितले.

यावेळी जिल्हास्तरावर निवड झालेल्या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मलकापूर उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, खामगाव तहसिलदार अतुल पाटोळे, नायब सिंदखेड राजा तहसीलदार ए. जी. मुजावर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार प्रमोद करे, खामगाव येथील अव्वल कारकुन व्ही. आर. निसंग, मलकापूर येथील महसूल सहायक जी. यू. खुळे, खामगाव येथील मंडळ अधिकारी के. एन. वरगट, तलाठी उषा संतोष देशमुख, वाहन चालक अनिल शेषराव उबरहांडे, शिपाई रामेश्वर कचरु शिंदे, कोतवाल राहुल तुकाराम मोरे, पोलीस पाटील मिलिंद मधुकर इंगळे यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला..