जिल्ह्यात निर्बंध लागू!; वाचा कसे अन्‌ काय राहणार सुरू, प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

 
जिल्हाधिकारी कार्यालय
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य शासनाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही 10 जानेवारीपासून निर्बंध व सूट दिलेल्या सेवांसह प्रतिबंधात्मक आदेश प्रभारी जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी पारित केले आहेत. जिल्ह्यात सूट दिलेल्या सेवांसह हे निर्बंध लागू राहणार आहेत. सेवांसाठी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे बंधनकारक आहे.

या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने, पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस पंप, तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी) आदी दुकाने, कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने, वनीकरणाची कामे, मान्यताप्राप्त माध्यम, सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, बिगर बॅकिंग वित्तीय संस्था, सूक्ष्म वित्तीय संस्था, सहकारी संस्था, पतपेढी, विमा, पोस्ट पेमेंट बँक, पाणी पुरवठा सेवा, लसीकरण केलेल्या व्यक्तींसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणार आहे.

स्वीमिंग पूल, स्पा, जिम, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू राहतील. सलून क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू असतील. सलूनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्या. सर्व प्रकारच्या शाळा, कोचिंग क्लासेस व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील. शिक्षकांना प्रशासकीय कामकाजाची मुभा असेल. लग्न समारंभासाठी केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी असणार आहे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी असेल. आठवडे बाजार बंद असतील. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा, क्रीडा शिबिरे व उपक्रम आयोजनास बंदी असेल. आधीच जाहीर स्पर्धा कोविड नियमांचे पालन करून सुरू राहतील.

शॉपिंग मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद असतील. मनोरंजन स्थळे, प्राणी संग्रहालय, वस्तु संग्रहालय, किल्ले व लोकांसाठी तिकिट लावलेली ठिकाणे संपूर्णत: बंद राहील. सिनेमागृहे, नाट्यगृहे एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील. सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी कामासाठी येताना कार्यालय प्रमुखांची परवानगी लागेल. कार्यालय प्रमुखांनी बैठका, संवाद हा ऑनलाईन पद्धतीने करावा.  खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व आस्थापनांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी आपापल्या स्तरावरून त्रिसूत्री पध्दतीची अंमलबजावणी करावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.