रविकांत तुपकरांच्या मुंबईतील आंदोलनाला यश;गारपीटीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात! जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २२० कोटी ३४ लाख
दुष्काळ,अतीवृष्टी आणि गारपीटीची मदत मिळावी यासाठी रविकांत तुपकरांनी वारंवार आंदोलने केली आहेत. एल्गार मोर्चानंतर मुंबईतील मंत्रालय ताबा आंदोलना दरम्यान २९ नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत सोयाबीन-कापूस दरवाढ यासह दुष्काळ, अवकाळी व गारपीटीची मदत यासह मागण्या त्यांनी आक्रमकपणे मांडल्या होत्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ, अवकाळी व गारपीटीच्या मदतीसंदर्भात शब्द दिला होता व त्यासंदर्भातील सुतोवाच ही त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केले होते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील गारपीट व अवकाळी पावसाने बाधित असलेल्या २ लाख ७६ हजार ५७५ शेतकऱ्यांना २२० कोटी ३४ लाख रुपयांची मदत मंजूर झाली होती. परंतु त्याचे श्रेय रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाईल म्हणून ही मदत तातडीने जमा न करता निवडणुकीच्या तोंडावर जमा केली जाईल, असे रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच सांगितले होते आणि रविकांत तुपकर यांनी सांगितल्याप्रमाणे ही रक्कम निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.
या मदतीसाठी रविकांत तुपकर व शेतकऱ्यांनी केलेली आंदोलने जनता विसरली नाही. तसेच सदर मंजूर झालेली रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी आग्रही मागणी देखील २० फेब्रुवारी रोजी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. गारपीट व अवकाळीचे नुकसान भरपाई येन निवडणुकीच्या काळातच जमा होईल आणि त्याचे श्रेय सत्ताधारी लोकप्रतिनिधी घेण्यासाठी पुढे धावतील, अशी भविष्यवाणी रविकांत तुपकर यांनी धाड जवळील सावळी येथे मागच्या महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या जाहीर सभेत केली होती आणि त्यांनी केलेली ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आहे. अवकाळी व गारपिटीच्या नुकसान भरपाईची २ लाख ७६ हजार ५७५ शेतकऱ्यांना २२० कोटी ३४ लाख रुपयांची मंजूर झालेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.