रविकांत तुपकरांची तब्येत खालावली; चक्कर येऊन कोसळले!

आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन, कापूस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आरपारची लढाई सुरू केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती सलग चार दिवस पोटात काहीच अन्‍न न गेल्यामुळे आज, १९ नोव्‍हेंबरला पहाटे खालावली. बीपी हाय अन्‌ शुगर डाऊन झाल्याने ते ब्रश करताना कोसळले. त्‍यांना बोलताही येत नसल्याने कार्यकर्त्यांत एकच धावपळ उडाली. त्‍यांची प्रकृती बिघडत चालल्याने आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. प्रशासन आणि सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांत संताप वाढत चालला असून, त्‍यात आता तुपकरांची प्रकृती बिघडत चालल्याने आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

आंदोलनाचा आज तिसरा दिवस उजाडला असला तरी आंदोलनाच्या आदल्या दिवशीपासून तुपकर उपाशी आहेत. बुलडाणा लाइव्ह आंदोलनस्‍थळी पोहोचले तेव्हा त्‍यांना बोलताही येत नव्हते. दुपारपर्यंत त्यांची प्रकृती आणखी खालावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप आंदोलनासंदर्भात कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. काल दिवसभर त्‍यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्हने दिल्यानंतर रात्री ९ वाजता त्यांची तपासणी करण्यात आली होती. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत एकाएकी खालावली. पोटात अन्‍नाचा कणही नसताना सातत्याने कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी ते काल मध्यरात्रीपर्यंत संवाद साधत होते. अशक्तपणा वाढत असल्याने त्‍यांना तातडीच्या वैद्यकीय उपचाराची गरज भासू शकते. मात्र तुपकर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटण्याच्या मनःस्‍थितीत नसल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढत चालली आहे.

पहिली रात्र प्रवासात, दुसरी घरासमोरील व्हरांड्यात झोपून
सोयाबीन, कापूस उत्‍पादक शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आता आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. हा लढा उभारणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर नागपुरातील संविधान चौकात अन्‍नत्‍याग सत्‍याग्रहाला बसले होते. मात्र पोलिसांनी अटक करून त्‍यांना बुलडाण्यात आणले. आता त्‍यांचा सत्याग्रह बुलडाण्यात सुरू झाला आहे. आंदोलनाची पहिली रात्र नागपूर ते बुलडाणा प्रवासात घालविल्यानंतर दुसरी रात्र त्यांनी व्हरांड्यात झोपून काढली. १८ नोव्हेंबरला सकाळी तुपकर बुलडाण्यातील निवासस्थानासमोर मंडप टाकण्यात आला. या मंडपात त्यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू गेला. दिवसभर जिल्ह्यातील विविध गावांत धरणे आंदोलने झाली. तुपकर यांना नागपूरवरून बुलडाण्याकडे आणल्याची वार्ता पसरताच शेतकरी व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाण्याकडे धाव घेतली.

पहा व्हिडिओ ः 

रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एकाएकी पाऊस आल्याने घरासमोरील मंडपही ओला झाला. त्यामुळे तुपकर व कार्यकर्त्यांनी घरासमोल छोट्याशा व्हऱ्यांड्यात ठाण मांडले.  रात्री १० च्या सुमारास वरवंड, सावळा या गावातील शेतकरी आंदोलनस्थळी आले. टाळ, मृदंग, तबला, पेटी वाजवत सर्वांनी भजने म्हटली. सरकारला सद्‌बुद्धी मिळावी, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी विठु माऊलीकडे प्रार्थना करण्यात आली. रात्री १ वाजेपर्यंत भजने सुरू होती. परमेश्वराची आराधना केल्याने, भजने म्हटल्याने शरीरात ऊर्जेचा संचार होतो असे यावेळी तुपकर म्‍हणाले होते. १ वाजेनंतर कार्यकर्त्यांनी तुपकरांनी व्हरांड्यातच विश्रांती घेतली. रिमझिम कोसणाऱ्या पावसाचे शिंतोडे व्हरांड्यात उडत होते. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांचा निर्धार असल्याने सर्व काही सहन करायचेच याच मानसिकतेने कार्यकर्तेही एकवटल्याचे दिसून आले. घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

tuar