स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढल्यावर रविकांत तुपकर याची सूचक फेसबुक पोस्ट! म्हणाले,"माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो..."
Jul 23, 2024, 08:48 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकण्यात आले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंधर पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दरम्यान या घोषणेनंतर रविकांत तुपकर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईट वर एक सूचक पोस्ट केली आहे. शिवाय फेसबुकवर देखील त्यांनी तीच पोस्ट केली आहे. तुपकर यांच्या या "सूचक" पोस्ट ची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
"संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो..माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो" अशी पोस्ट रविकांत तुपकर यांनी केली आहे. याशिवाय यांनी कवी सुरेश भट यांच्या " विझलो जरी आज मी..हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने ,हे सामर्थ्य नाशवंत नाही.." या कवितेच्या ओळी देखील पोस्ट केल्या आहेत. तुपकर यांच्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढल्यानंतर रविकांत तुपकर यांनी "बुलडाणा लाइव्ह" ला प्रतिक्रिया दिली होती. २२ वर्षे शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला, पोलीसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो. संघटना कानाकोपऱ्यात पोहचवली याचे फळ राजू शेट्टी असे देतील असे वाटले नव्हते. हा दुर्दैवी दिवस आहे, २४ जुलैला राज्यातील शेतकरी चळवळीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पुण्यात बोलावली आहे, त्या बैठकीत यावर अधिक बोलून पुढची दिशा ठरवणार असल्याचे तुपकर यांनी म्हटले.