रविकांत तुपकरांच्या जामीनावर आता १८ जुलैला फैसला! तुपकरांनी न्यायालयात मांडली बाजू

 
Rt
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रभर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे रविकांत तुपकर यांना आत्मदहन आंदोलन प्रकरणी देण्यात आलेला जामीन रद्द करावा, अशी मागणी बुलडाणा शहर पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. याबाबत ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर यापूर्वी २६ जून रोजी न्यायालयात झालेल्या सुनावनीत आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने रविकांत तुपकर ४ जुलै राजी तारीख दिली होती. त्यानुसार तुपकर आज न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी लेखी बाजू देखील मांडली, याप्रकरणी आता न्यायालयाने १८ जुलै रोजी तारीख दिली असून आता १८ जुलैच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर सातत्याने आक्रमक आंदोलन करतात. त्यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबरला 'एल्गार' मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन त्यांनी अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईत धडक दिली. तर त्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी आत्मदहन आंदोलन केले. हे आंदोलन चांगलेच चिघळले होते. पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला होता. यानंतर तुपकरांसह त्यांच्या ३६ सहकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करत तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर सत्र न्यायालयाने रविकांत तुपकर व इतर आंदोलकांची जामिनावर सुटका केली होती. मात्र त्यानंतरही सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे पिकविमा, अतिवृष्टीची व सततच्या पावसाची नुकसान भरपाई तातडीने जमा करण्याचे संदर्भात कृती न केल्याने तुपकरांनी १६ जून रोजी मुंबईत पिकविमा कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरुन शेतकऱ्यांसह उड्या घेण्याचा इशारा दिला होता. या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देखील पोलिसांनी तुपकरांना नोटीस दिली होती तसेच रविकांत तुपकरांना १४ जून रोजी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रशासनाने मध्यस्थी करत पिकविमा कंपनीशी तुपकरांची चर्चा घडवून आणली आणि पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. दरम्यान बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तुपकरांना आत्मदहन आंदोलन प्रकरणात देण्यात आलेला जामीन रद्द करावा, असा अर्ज १४ जून रोजी जिल्हा न्यायालयाकडे केला होता. या अर्जाविरुद्ध कारण दाखविण्यासाठी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता न्यायालयात हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने रविकांत तुपकरांना दिले होते. नेमकी याच दिवशी तुपकरांची मुंबई येथील एका आंदोलनाप्रकरणी तेथील न्यायालयात तारीख होती. एकाच वेळी दोन्ही न्यायालयात हजर राहणे शक्य नसल्याने तुपकर मुंबई न्यायालयात हजर राहिले तर बुलढाणा न्यायालयात रविकांत तुपकरांच्या वतीने ॲड. शर्वरी सावजी-तुपकर न्यायालयात हजर झाल्या. त्यावेळी रविकांत तुपकर यांना आपली बाजू मांडण्याची संधी देत न्यायालयाने ४ जुलै ही पुढील तारीख दिली होती. त्यानुसार तुपकर आज न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी आपली बाजू न्यायालयात मांडली आहे. आता याप्रकरणी न्यायालयाने १८ जुलै ही तारीख दिली असून तुपकरांचा जामीन रद्दच्या निर्णयावर फैसला आता १८ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा १८ जुलै कडे लागल्या आहेत.