रविकांत तुपकरांच्या ९ साथीदारांना अटकपुर्व जामीन मंजूर! ११ तारखेपासून पोलीस शोध घेत होते पण सापडलेच नाहीत..

 
Buldana
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारीला आत्मदहन आंदोलन केले होते. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात ३६ व इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वतः रविकांत तुपकर व त्यांच्या २६ साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. उर्वरित ९ जणांचा पोलीस शोध घेत होते. मात्र आता त्या ९ जणांना आज,२४ फेब्रुवारीला अटक पूर्व जामीन मंजूर झाला आहे.
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले, प्रदीप शेळके, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, आकाश माळोदे यांच्यासह  ९ जणांचा अटक पूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. याआधी रविकांत तुपकर व त्यांच्या २६ साथीदारांना न्यायालयीन कोठडी  मिळाल्यानंतर त्यांचाही जामीन झाला होता. दरम्यान पुढील महिन्यापासून रविकांत तुपकर जिल्हाभर यात्रा काढणार आहेत. मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहील असे तुपकर यांनी म्हटले आहे.