रविकांत तुपकर आज घेणार पत्रकार परिषद! पुढील भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष..! नव्या आंदोलनाचे रणशिंग फुंकणार का?

 
Tupkar
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ११ नोव्हेंबरला बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन केले होते. पोलिसांच्या वेशात येत त्यांनी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्ताला चकमा दिला होता. त्यानंतर तुपकरांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. न्यायालयीन कोठडीदरम्यान तुपकर व त्यांच्या साथीदारांना अकोला कारागृहात ठेवण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीतून मुक्तता झाल्यानंतर तुपकर यांनी मरेपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज, २१ फेब्रुवारीला रविकांत तुपकर  पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. दुपारी १२ वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

Jahirat

जाहिरात 👆

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर सातत्याने लढत आहेत. ६ नोव्हेंबरला त्यांनी बुलडाणा शहरात एल्गार मोर्चा काढला होता. त्यानंतर मुंबईत त्यांनी जलसमाधी आंदोलन केले, आंदोलनानंतर तुपकर यांच्याशी मुख्यमंत्री , उपुख्यमंत्र्यांनी चर्चा करून काहीअंशी मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र सोयाबीन कापसाची भाववाढ, पिकविम्याची उर्वरित रक्कम, अतिवृष्टीची मदत आदी मागण्यांसाठी तुपकर यांनी एकतर "आत्मदहन करू द्या नाहीतर आम्हाला गोळ्या घालून मारा" असे आंदोलन केले होते. त्यानंतर तुपकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान आज पहिल्यांदा रविकांत तुपकर सोयाबीन कापूस आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

तुपकर आज काय बोलतात? तुपकरांची पुढील भूमिका काय असेल? आंदोलन चिरडण्यात जिल्ह्यातल्या काही लोकप्रतिनिधींची भूमिका असल्याचा आरोप तुपकर यांनी केला होता यावर ते काही भाष्य करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे तुपकरांच्या भूमिकेकडे पोलिस प्रशासनाने सुद्धा लक्ष असेल. रविकांत तुपकर यांची पत्रकार परिषद बुलडाणा लाइव्ह च्या वाचकांना बुलडाणा लाइव्ह च्या यु- ट्यूब चॅनल वर थेट पाहता येईल.