रविकांत तुपकर मुंबईत दाखल ; वेगवेगळ्या मार्गाने शेतकरी होतायेत मुंबईत दाखल!कर्जमुक्ती,पिकविमा,सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या '

वर्षा' बंगल्यात शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक दाखवून करणार आंदोलन...

 
Tupkar
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना घेऊन मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा" निवासस्थानी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईत दाखल झाले आहे. तर शेतकरीही वेगवेगळ्या मार्गाने मुंबईत दाखल होत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तुपकरांची शोधाशोध सुरू आहे. कर्जमुक्ती,पिकविमा,सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यात शेतकरी कसा आत्महत्या करतो याचे प्रात्यक्षिक दाखविणार असल्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे या आंदोलनात नेमके काय घडते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.
  शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २० ऑगस्ट रोजी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. त्यामुळे सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना घेऊन २३ ऑगस्ट रोजी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी शेतकरी आत्महत्या कसे करतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी यापूर्वी देखील रविकांत तुपकरांनी हजारो शेतकऱ्यांना घेवून थेट मुंबईत धडक देऊन आंदोलने केलेली आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता २१ ऑगस्ट रोजी १६८ नुसार रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही रविकांत तुपकर मुंबईत दाखल झाले आहे, तर शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने मुंबईत दाखल होत आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून तुपकर व शेतकऱ्यांची शोधाशोध करीत आहे, तर दुसरीकडे तुपकर मात्र आंदोलनाव ठाम असून सरकारने आमच्या मागण्याबाबत ठोस निर्णय घ्यावे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून नेमके काय होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.