ओबीसी नेते लक्षण हाकेंच्या विरोधात राजपूत समाज आक्रमक! लक्ष्मण हाके समाजद्रोही, महाराष्ट्रात फिरण्याची बंदी घालण्याची मागणी; चिखलीत तहसीलदारांना निवेदन...

 

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा - ओबीसी असा संघर्ष राज्यात निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये दररोज विविध कारणांमधून वाकयुद्ध होताना दिसून येत आहे. ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी जरांगेंनी लावून धरली असताना लक्ष्मण हाके याला तीव्र विरोध करीत आहेत. ओबीसीतून आरक्षण देवू नये या मागणीसाठी हाके यांनी देखील राज्यात व्यापक आंदोलनास्त्र उगारले. दरम्यान, ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके आणि वाघमारे हे महाराष्ट्रातील श्रद्धास्थानी आशीर्वाद घेण्यासाठी निघाले आहेत. २७ जून रोजी हाके वाशिम जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यात सकल राजपूत समाजाविषयी वादग्रस्त विधान केले. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावरून राजपूत समाज आक्रमक झाला असून चिखली तहसीलदारांना आज २९ जून रोजी निवेदन देण्यात आले. वादग्रस्त वक्तव्य करत समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी हाके यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केल्या गेली. 

लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजपूत समाजात तीव्र रोष होताना दिसत आहे. अशा समाजद्रोही व्यक्तीला राज्यातून हाकलून द्यावे. व कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.
 २७ जून रोजी वाशिम येथे प्रसार माध्यमांशी राजपूत समाजा विषयी बोलताना हाके शब्दशः म्हणाले की, आमच्या भटक्यांमध्ये "भामट्या राजपूत नावाची कम्युनिटी आहे, ते सुद्धा बोगस विजेएनटीचे दाखले काढून मूळ विजेएनटीच्या हक्क आणि अधिकारावर अतिक्रमण करीत आहेत. " याच वक्तव्याचा सकल राजपूत समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत असून, समाजात संतापाची लाट उसळली आहे.