राजर्षी शाहू मल्टिस्टेटला बेस्ट मोबाईल ॲप इनिटीएटिव्ह पुरस्कार;गोवा येथे संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके यांनी स्वीकारला पुरस्कार

 

बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. पतसंस्थेला एफसीबीए अवॉर्ड २०२३ अंतर्गत बेस्ट मोबाईल ॲप इनिटीएटिव्ह पुरस्कार मिळाला आहे. संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके यांनी १२ ऑक्टोबर रोजी गोवा येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.

संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी ८ मे २०१३ रोजी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिक बँकेशी जोडणे, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे, सामाजिक बांधिलकी जोपासणे, युवकांना रोजगार उपलब्ध करणे यासह उत्तम बँकिंग सेवा देण्याचे काम पतसंस्था करीत आहे.  

पतसंस्थेला यापूर्वी सहकारातील मानाचा मल्टिस्टेट फेडरेशनचा सहकार गौरव पुरस्कार मिळालेला आहे. तसेच आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले आहे. सध्या ग्रामीण व मल्टिस्टेट मिळून ८४ शाखा आहेत. तर पाच धान्य गोदाम आहेत. यामाध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. एफसीबीए अवॉर्ड २०२३ अंतर्गत बेस्ट मोबाईल ॲप इनिटीएटिव्ह पुरस्कार मिळाल्याने संस्थेच्या वैभवात भर पडली आहे. हा पुरस्कार ठेवीदार, ग्राहक, खातेदार यांना समर्पित करीत असल्याचे संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके यांनी सांगितले.