जिल्ह्यात कोसळणार 'पाऊसधारा' ! सर्वत्र मशागतीच्या कामांची लगबग, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचा सल्ला..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आजपासून पुढच्या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज ८ व ९ जून रोजी जिल्ह्यातील काही भागात तुरळक स्वरूपात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 
  प्रसंगी वादळी वाऱ्यासह देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी मान्सूनच्या तोंडावर मशागतीची लगबग सुरू केली आहे. काहींनी बी बियाणे खरेदीस प्राधान्य दिले आहे. किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय तथा जमिनीमध्ये चांगली ओल असल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. घाटावरील भागात तुलनेने कमी पाऊस झाला असून घाटाखालील चांगला पाऊस झाला आहे.