समृद्धी महामार्गावरील दुसरबीड टोल नाक्यावर राडा - राडा ! एक प्रवाशी गंभीर! टोल कर्मचाऱ्यांवर पिस्तुल उगारली?

 
बिबी
बिबी(जयजीत आडे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृध्दी महामार्गावरील दुसरबीड टोलनाक्यावर काल, ४ जुलैला दुपारी राडा झाला. टोल नाक्यावरील महिला कर्मचारी व प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी पुरुष सहकाऱ्यांना बोलावले त्यानंतर प्रवाशी आणि पुरुष कर्मचाऱ्यात धक्काबुक्की झाली. यावेळी एका प्रवाशाने पिस्तूल काढल्याचा आरोप टोल कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान या मारहाणी एक प्रवाशी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टोल कर्मचाऱ्यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून दोघा प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 ४ जुलैच्या दुपारी २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार महिला कर्मचाऱ्यांशी प्रवाशांनी वाद घातल्यानंतर टोल मॅनेजर आणि सुपरवायझर टोलकडे जात असताना तिघांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे टोल मॅनेजर आणि सुपरवायझर ऑफिस कडे पळाले असता मारहाण करणाऱ्यांपैकी पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीने हातात पिस्तूल घेतल्याचे दिसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी टोल वरिष्ठ व्यवस्थापक राजु यांनी मध्यस्थी करून त्या व्यक्तीच्या हातातील पिस्टल काढून घेतली व त्यांना तेथून जाण्यास सांगितले. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाचे नाव वसीम तांबोळी तर दुसऱ्याचे नाव मौसिम तांबोळी आहे, तिसरा अनोळखी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणात दुसऱ्या बाजूनेही तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे,कारण या घटनेत प्रवाशांची गाडी क्रमांक एमएच २१, सीए ३५९९ मधील प्रवाशांना देखील गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जालन्यात उपचार सुरू आहेत.