मेहकर बसस्थानकात मूलभूत सोयी सुविधा द्या ! अन्यथा तीव्र आंदोलन; तालुका युवक काँग्रेस आक्रमक..

 
मेहकर (अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर बस स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. दररोज हजारो प्रवाश्यांना याचा त्रास सहन करावा लागत असून तातडीने मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यात याव्या, यासह उपाययोजना राबविण्यात आल्या पाहिजे असे निवेदन तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मेहकर आगार प्रमुखांना आज ९ जुलै रोजी देण्यात आले. 
   मेहकर बसस्थानक परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे निवेदनात म्हटले असून महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था झाली पाहिजे. प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, बस सेवा सुरळीत व्हावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. आगार व्यवस्थापनाने याकडे लक्ष देऊन देवून प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्या अन्यथा पुढील काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मेहकर आगार व्यवस्थापक श्री जोगदंडे यांना हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे महासचिव दिलीप बोरे, तालुकाध्यक्ष भुषण काळे , परमेश्वर लाड , ज्ञानेश्वर पाटील यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.