जिल्ह्याच्या सुपुत्राला राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक

दोन दहशतवाद्यांना धाडले होते यमसदनी
 
 
file photo

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  उंद्री (ता. चिखली) येथील सुपुत्र ज्ञानेश्वर श्रीराम साबळे यांना काल, २२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले. १९ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधील  बारामुल्ला क्षेत्रात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या २ दहशतवाद्यांना साबळे यांनी यमसदनी धाडले होते. या पराक्रमाबद्दल त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.

शौर्यपदक मिळालेले श्री. साबळे हे असे पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील दुसरे जवान ठरले असून, यापूर्वी २००२ मध्ये किन्होळा (ता. चिखली) येथील रमेश बाहेकर यांना एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्यपदक मिळाले होते. सामान्य शेतकरी कुटूंबात श्री. साबळे यांचा जन्म झाला होता. भारतमातेची सेवा करायची हे स्वप्न उराशी बाळगून २००६ मध्ये ते भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. सीआरपीएफच्या ५३ बटालियनमध्ये कार्यरत असताना बारामुल्ला सेक्टरमध्ये त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. श्री. साबळे यांना शौर्यपदक मिळाल्यानंतर उंद्री गावात फटाके फोडण्यात आले.