इकबाल नगर परिसरात मान्सूनपूर्व स्वच्छता गरजेची! नदीम शेख यांचे मुख्याधिकारी पांडे यांना निवेदन

 
Bddbn
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  
शहरातील इकबाल नगर परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला असून नगरपरिषद कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्याचे निवेदन देवून स्वच्छता अभियानासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सामजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नदीम शेख यांनी दिला. याबाबत काल मंगळवार, १४ मे रोजी मुख्याधिकारी गणेश पांडे यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक दिवसांपासून इक्बाल नगर परिसरातील झोपडपट्टी, टिपू सुलतान चौक, उर्दू हायस्कूल परिसर, मदिना मज्जिद परिसर, यासह अन्य काही भागात नगरपरिषदेकडून थातूरमातूर स्वरूपाची साफसफाई होत आहे. घाणीचे साम्राज्य वाढल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. असे असताना, संबंधित ठेकेदाराला याबाबत बोलूनही काही फायदा होत नाही. पुढील दिवसात मान्सून काळात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा या भागात पाहिजे तशी स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे या भागात विशेष स्वच्छता अभियान राबवणे अत्यंत गरजेचे आहे. तातडीने बुलढाणा शहरासह इकबाल नगर परिसरातील सर्व प्रभागात विशेष स्वच्छता अभियान चालविण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. असा इशारा नदीम शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी नदीम शेख, मोहम्मद नईम उर्फ शानु, अजीम खान अलीम खान, शेख ईब्राहित इब्बु आदि उपस्थित होते.