जिल्हा प्रशासनातर्फे सुवर्णपदक प्राप्त प्रथमेश जवकारचे कौतुक; जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा;

आशियाई क्रीडा स्पर्धेत बुलडाणेकर प्रथमेशने देशासाठी मिळवले सुवर्ण...
 
Jdnxnxj
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविणाऱ्या बुलडाणेकर प्रथमेश जवकार याचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दूरध्वनीद्वारे चीन येथे असलेल्या प्रथमेश जवकारचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
19वी आशियाई क्रीडा स्पर्धा चीन येथील हांगझोऊ येथे सुरु आहे. या स्पर्धेत कंपाऊंड राऊंडमध्ये सांघिक प्रकारातील सुवर्ण पदक मिळविणाऱ्या आलमपूर, ता. नांदुरा येथील प्रथमेश समाधान जवकार याने ऐतिहासिक कामगिरी करुन जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नोंदविले आहे. कठोर मेहनतीने प्रथमेशने ग्रामीण भागातील प्रतिभा दाखविली आहे. प्रथमेश जवकार हा खेळाडू बुलडाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत बुलढाणा तालुका क्रीडा संकुल समिती येथील खेळाडू असून आर्चरीचा नियमित सराव करीत आहे.
सन 2023 मधील हे त्याचे तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्ण आहे. यासोबत एक रौप्य, एक कास्य पदकाची कमाई त्याने केली आहे. सदर स्पर्धेसाठी त्याच्यासह दिल्लीचा अभिषेक वर्मा, नागपूरचा ओजस देवतडे यांच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरिया सारख्या बलाढ्य संघाला एकतर्फी मात दिली. प्रथमेशने लहानपनापासूनच ऑलिंपिक पदक ध्येय ठेऊन कारकिर्दीस सुरुवात केली आहे. जागतिक क्रमवारीत त्याने पहिल्या क्रमांकाचे ध्येय बाळगले आहे. त्यादृष्टीने सलग दोनवेळा पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव करीत स्वत:मधील गुणवत्तेची चुणूक दाखविली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या मानाच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवित त्याने बुलढाणाचे नाव संपूर्ण जगामध्ये कोरले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलडाणा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी प्रथमेश जवकारचे कौतुक केले आहे.