POLITICAL SPECIAL दोन भूमिपुत्र प्रशासकीय सेवेतून राजकीय आखाड्यात! सिंदखेडराजातून दिनेश गिते तर मेहकरमधून सिद्धार्थ खरात आजमावणार नशिब..!

 
बुलडाणा(अनिल म्हस्के): आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करून सर्व समाजघटकांना न्याय देत समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या जिल्ह्यातील दोन भूमिपुत्रांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिनेश गिते व सिद्धार्थ खरात यांनी 'आमदारकी'ची तयारी चालविली आहे. सप्टेबरमध्ये निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता लक्षात घेत निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी मातृतीर्थातून 'तुतारी' वाजविण्यासाठी लंगोट बांधला आहे. तर मंत्रालयातील सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी 'कोणता झेंडा घेऊ हाती' याबाबत अद्याप स्पष्ट केले नसलेतरी मेहकरातून ते लढतील, अशी चर्चा आहे.
मूळ देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा येथील रहिवासी असलेले दिनेश गिते यांनी तहसीलदार म्हणून आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली. तर निवासी उपजिल्हाधिकारी असतानाच राजकारणात उतरण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. बुलढाण्यात तहसीलदार असताना दुष्काळात संधीचे सोने करत येळगाव धरणातील गाळ काढण्याचे अभियान राबविले. धरणाची खोली वाढविण्यासोबतच परिसरातील जमीन सुपीक करण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन राज्यात अव्वल क्रमांक मिळविला होता. त्याचप्रमाणे 'बीजेएस'च्या माध्यमातूनदेखील नदीखोलीकरण अभियान प्रभावीपणे राबविले. त्यासोबतच कोरोना काळात अनेकांचा जीव वाचविण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. जिल्हा स्त्री रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी खुले करून देत तेथेच औषधोपचाराची सुविधा निर्माण करण्याकरिता गिते यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला व यंत्रणा उभीदेखील केली.
दोन दशके प्रशासकीय सेवा केल्यानंतर आता प्रत्यक्ष समाजसेवा करण्यासाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय दिनेश गिते यांनी घेतला. माजीमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादा पवार गटात प्रवेश केल्याने शरद पवार गटात असलेली पोकळी लक्षात घेता गिते यांनी आघाडीकडून तुतारी वाजविण्याचा निर्धार केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सिद्धार्थ खरात मेहकर विधानसभेतून....
उच्च दर्जाचे मंत्रालयीन कक्ष अधिकारी ते सहसचिव अशा प्रशासकीय सेवेतील प्रवासादरम्यान अनेक दिग्गज मंत्र्यांकडे स्वीय सहायकपदाची जबाबदारी सांभाळणारे सिद्धार्थ खरात यांनी नुकताच स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेऊन मेहकर विधानसभेत नशिब आजमाविण्याचा निर्धार केल्याचे समजते. गेल्या पंधरा वर्षांपासून मेहकर मतदारसंघ राखीव आहे. अनेक दिग्गजांच्या नजरा या मतदारसंघाकडे आहे. परंतु आ. संजय रायमूलकर यांची मतदारसंघावरील पकड लक्षात घेता अनेकांनी केवळ विचार करून सोडून दिला. या मतदारसंघाचे नेतृत्व तब्बल तीनवेळा विद्यमान केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. त्यामुळे हा मजबूत गड सिद्धार्थ खरात कशाप्रकारे सर करतात व कोणता झेंडा हाती घेऊन करतात, हे येणारा काळच सांगेल!'
घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी' या म्हणीप्रमाणे सिद्धार्थ खरात हे प्रशासकीय सेवेदरम्यान मुंबईस्थित झाले असलेतरी त्यांचे लक्ष आपल्या जिल्ह्याकडेच नेहमी राहिले आहे. अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा सुरुवातीपासूनच दिसून येत असल्याने आता योग्यवेळी ते नशिब आजमावत असल्याचे बोलल्या जात आहे.
उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या पत्नी बुलढाण्यातून रिंगणात
उपरोक्त दोन्ही अधिकाऱ्यांप्रमाणे सुनील शेळके यांनीदेखील उपजिल्हाधिकारीपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सुनील शेळके हे प्रशासकीय सेवेत असतानाच त्यांच्या पत्नी जयश्री शेळके राजकारणात उतरल्या. विविध सामाजिक उपक्रम राबविले. राजकारणातून समाजकारण केले. सुनील शेळके यांनीदेखील प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून जनतेची अप्रत्यक्ष समाजसेवा केली. आपल्या प्रशासकीय सेवेतून अर्धांगिनीला कुठलीही अडचण येऊ नये, त्यांना राजकारणात आपला संपूर्ण पाठिंबा देता यावा, यादृष्टीने शेळके यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता ते भक्कमपणे आणि निर्धास्थ राजकारणात आपल्या पत्नीच्या पाठीशी उभे राहतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.