राजकीय पक्ष, संघटनांनो सावधान! मोर्चे, धरणे, रॅली, आंदोलनास मज्जाव!!

जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
 
जिल्हाधिकारी कार्यालय
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः होय! राजकीय पक्ष वा संघटनांना दोन दिवस का होईना, जिल्ह्यात कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन करता येणार नाहीये ! याचे कारण जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश अर्थात कलम १४४ लागू केले आहे. यामुळे राजकारणी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने स्थगित केलेलीच बरं अन्यथा त्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार हाय!!
हे आदेश २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पासून लागू झाले असून त्याचा अंमल २३ नोव्‍हेंबरच्या रात्री १ पर्यंत राहणार आहे. अर्थात फौजदारी संहिता १९७३ अंतर्गतचे १४४ कलम १३ तालुका ठिकाण आणि नगरपरिषद हद्द या मर्यादेतच लागू राहणार आहे. या आदेशानुसार या क्षेत्रात ५ किंवा ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही. मात्र यातून कोविड लसीकरणास सूट देण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती वा संस्थेविरुद्ध १९६० च्या कायद्यातील कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.