पोलीस ठरले देवदूत! पायाला ठेच लागून विहीरीत पडलेल्या व्यक्तीला कसे वाचवले! बोराखेडीचे ठाणेदार बळीराम गीतेंची कार्यतत्परता

 
Yygu
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत पोलीस माणुसकीचा धर्म पाळून लोकांची मने जिंकत आहेत.बोराखेडीचे ठाणेदार बळीराम गीते यांनी आपल्या खाकी वर्दीत सहृदयतेचा परिचय दिलाय. होय! त्यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचविले. हाता पायाला जखम आणि खोल विहिरीत पडलेल्या एका व्यक्तीसाठी बळीराम गीते देवदूत ठरले. अनंत जयसिंग गायकवाड असे प्राण वाचलेल्या इसमाचे नाव आहे.

नेहमीच सक्तीचे नियम पाळणाऱ्या पोलिसांनाही मन असतं..भावना असतात.. खाकी वर्दीतही मानवतेचे दर्शन घडते. आज ३१ जानेवारीलाही मोताळा तालुक्यातील नवनियुक्त ठाणेदार बळीराम गीते यांच्या कार्य तत्परतेमुळे  एका व्यक्तीचे प्राण वाचवल्याने माणुसकीचे दर्शन घडले. खोल विहिरी मधून एका व्यक्तीचा मदतीसाठी जोरजोरात आवाज येत असल्याने, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी ठाणेदार बळीराम गीते यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील, यशवंत तायडे, अभिनंदन शिंदे, शरद खर्चे यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. विहिरीतील व्यक्ती दोरीच्या साह्याने पाण्यात मदतीची आस लावून उभा होता. दरम्यान शिवाजी देशमुख, योगेश देशमुख रा. मोताळा व वासुदेव खर्चे रा.आडविहीर या नागरिकांना बोलावण्यात येऊन पोलिसांनी त्यांच्या मदतीने अनंत गायकवाड यांना विहिरीबाहेर सुखरूप काढले. उपचारार्थ  रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे.

पायाला ठेच लागून थेट विहिरीत पडले..

बुलडाणा शहरातील केशवनगर येथे राहणारे अनंत गायकवाड (५६) हे सायंकाळी ७.४५ वाजता
सेवागिरी बाबा आश्रम मोताळा येथे जात होते. दरम्यान ते लघुशंकेसाठी गेले असता पायाला ठेच लागल्याने त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. मात्र मोताळा पोलिसांनी या व्यक्तीला जीवदान दिले आहे.