५ जानेवारीला 'फुले दाम्पत्य' महाराष्ट्राच्या भेटीला! 'सत्यशोधक' मध्ये मांडला जीवन संघर्ष; संदीप कुळकर्णी म्हणाले, महात्म्याची भूमिका ठरली आव्हान

 
Satya
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रतिकूल काळात व प्रचंड सामाजिक विरोध पत्करून स्त्री शिक्षण व सक्षमीकरण करण्यासाठी आजीवन संघर्ष करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि आध्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष साकारणारा 'सत्यशोधक'हा चित्रपट आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करणाऱ्या या दाम्पत्याचा जीवनपट दोनेक तासांच्या चित्रपटात मांडणे मोठे आव्हानच ठरले. त्यांची जीवन गाथा, इतिहास ठरलेला संघर्ष आम्ही 'सत्यशोधक' चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन निर्माते सुनील शेळके यांनी येथे केले.
येथील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये बुधवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी आयोजित पत्र परिषदेत अभिता फिल्म्सचे सुनील शेळके यांनी वरील शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. समता फिल्म्स आणि अभिता फिल्मस निर्मित सत्यशोधक हा चित्रपट 'रिलायन्स एंटरटेनमेंट' मार्फत ५ जानेवारीला एकाच वेळी १२० चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे शेळके म्हणाले. यावेळी महात्मा फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते संदीप कुळकर्णी यासह सामाजिक कार्यकर्ते दामोदर बिडवे, माधव हुडेकर हजर होते. महामानवांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रदर्शन पूर्वीच उत्सुकता निर्माण केली आहे. नुकतेच आलेल्या 'ट्रेलर' चे स्वागत झाले असल्याचा दावा शेळके यांनी केला.तसेच 'बेस्ट ऑटोग्राफी' चे २ आंतरराष्ट्रीय पुरस्कार तर जर्मनी मध्ये उत्कृष्ट निर्देशकाचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. निलेश जळमकर यांची पटकथा आणि निर्देशन, संदीप कुळकर्णी (महात्मा फुले) , राजश्री देशपांडे ( सावित्रीबाई) यांचा दर्जेदार ठरला आहे. याशिवाय रवींद्र मंकणी, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा हे कलाकार देखील विविध भूमिकेत आहे.
 
परिश्रमाला होमवर्क ची जोड: कुळकर्णी
   मध्यवर्ती भूमिका साकारणारे कुळकर्णी यांना बहुचर्चित डोंबिवली फास्ट आणि श्वास या चित्रपटासाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. ते म्हणाले की इतर भूमिका साकारणे आणि महात्मा फुले साकारणे या खूप अंतर आहे. या भूमिकेसाठी आपण त्याकाळातील संदर्भ, लिखाण ,साहित्य याचा अभ्यास केला. याला अभिनय व परिश्रमाची जोड दिल्याने भूमिकेला न्याय देऊ शकलो. चांगली कथा आणि अभिनय असला तर मराठी चित्रपट देखील चालू शकतात हे अलीकडच्या चित्रपटांनी दाखवून दिले. त्यामुळे सत्यशोधक ही प्रेक्षकांना प्रचंड भावणार अशी खात्री असल्याचे कुळकर्णी म्हणाले.