जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविण्यात आलेल्या व सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याची निर्मिती, विक्री व साठवणूक करण्यावर बुलडाणा जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

मकरसंक्रांत या सणाच्या अनुषंगाने पतंग उडविले जातात. मात्र या पतंगाला नायलॉन मांजा वापरल्यामुळे पक्षी व मानव जीवितास इजा पोहोचते. दोन पतंगामध्ये दोऱ्याचे घर्षण होऊन मोठ्या प्रमाणात मांजा तुटून उंच झाडे व इमारतीमध्ये अडकतो. त्यामुळे वनपक्षी यांच्या जिवीतास धोका निर्माण होऊन पशू- पक्षी जखमी अथवा मृत होतात. पतंगासह तुटलेल्या नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडून त्याचे विघटन होण्यासारखे नसल्याने गटारे व नदी – नाल्यांसारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात.

तसेच गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ठ असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशा प्रकारे मांजा अथवा धाग्यांमधील प्लास्टिकच्या वस्तूंमूळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे जिल्ह्यात सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूक करणाऱ्यांना नायलॉन मांजा विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था यांनी उल्लंघन केल्यास ही बाब पर्यावरण अधिनियम अंतर्गत शिक्षेस पात्र असणार आहे, असे प्रभारी जिल्हा दंडाधिकारी धनजंय गोगटे यांनी कळविले आहे.