"पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची"! जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणदणला; जिल्ह्यातले हजारो सरकारी कर्मचारी संपावर! कार्यालयात केवळ रिकाम्या खुर्च्या

 
Ghg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. आज,१४ मार्चपासून जिल्ह्यातील हजारो सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. महसूल, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद यासह जवळपास सगळ्याच शासकीय कार्यालयांतील कर्मचारी संपावर गेल्याने यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुनी पेन्शन कर्मचारी संघटनेने आज दणक्यात घोषणाबाजी केली. आता आर - पार ची भूमिका आहे, सरकार जोपर्यंत जुनी पेन्शन लागू करीत नाही तोपर्यंत माघार नाहीच अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. "पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची" अशा घोषणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यातील शेकडो शाळांना व सरकारी कार्यालयांना टाळे लागले आहेत. सरकारी कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसून येत आहेत,त्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत.

  
  जिल्ह्यातल्या  महसूल विभागातील ३१ क्लास वन अधिकाऱ्यांनी काल,१३ मार्चला एका दिवसाची रजा घेऊन जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीला समर्थन दिले होते. क्लास २ चे ३ अधिकारी आजपासून बेमुदत संपात सहभागी आहेत. क्लास ३ चे ४३५ कर्मचारी तर क्लास ४ च्या ९६ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला  आहेत. (हा आकडा केवळ जिल्ह्यातील महसूल विभागाचा आहे)