पंजाबराव डख उद्या जिल्ह्यात! अंचरवाडीत शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन
Mon, 10 Apr 2023

अंचरवाडी ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख उद्या, ११ एप्रिलला बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे गवळी बाबा मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यासह देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज देण्यात पंजाबराव डख यांचा हातखंडा आहे. हवामानाची पूर्वसूचना मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतातील कामे उरकायला सोयीचे होते. विशेष म्हणजे यंदा लग्नाच्या तारखा काढतांना सुद्धा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज विचारात घेतल्या जात आहे. अंचरवाडी येथील गवळी बाबा मित्र मंडळाने पंजाबराव डख यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कृषी अभ्यासक धनंजय भारंबे हेसुद्धा यावेळी बदलत्या तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अंचरवाडी येथील मोठ्या मळ्यात हा कार्यक्रम दुपारी १ वाजता सुरू होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.