लोणार तालुक्यात साथीच्या रोगाचे थैमान; डोकेदुखी, सर्दी, ताप, खोकल्या सारख्या आजाराने बिबी ग्रामस्थ हैराण !

 
Hgc
बिबी (जगजित आडे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोणार तालुक्यातील बिबी येथे साथीच्या रोगराईने ग्रामस्थ हैरान झाले असून ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी भरगच्च भरले असल्याचे चित्र आहे. परिसरात सर्दी, पडसे, ताप, खोकला अशा व्हायरल इन्फेक्शनच्या आजाराने थैमान घातल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसत आहे.
 रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत असताना, बीबी ग्रामीण रुग्णालयात तीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी पदावर आहेत. परंतु त्यापैकी दोन अधिकारी स्वतःच्या सोयीनुसार कर्तव्य बजावत असल्याची चर्चा रुग्ण, नातेवाईकांकडून होत आहे. अधिकारी हजर नसल्याने तीस किलोमीटर दूर अंतरावर जावून तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरात सर्दी, खोकला, ताप, संडास अश्या आजारांनी डोके वर काढले आहे. डॉक्टरांची अनियमितता असल्याने अनेकांना खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागत असल्याचे दिसून आले. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात येते. आरोग्य विभागाने यावर लक्ष देऊन ग्रामीण भागातील जनतेला परिपूर्ण आरोग्य सुविधा पुरवल्या पाहिजेत. अशी आर्त मागणी होत आहे.