अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करू! संदीप शेळकेंचा ईशारा; महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगारांना न्याय देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..पहा व्हिडिओ..
Updated: Oct 31, 2023, 18:07 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जेव्हा कुणी काम करायला तयार नव्हते अशा कठीण कोविड काळापासून आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण न करताच कामावरून कमी करण्याची भूमिका संबधित कंपनीने घेतली आहे. हा डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्यावर होणारा अन्याय आहे. एका खाजगी कंपनीला डाटा ऑपरेटर भरण्याची जबाबदारी सरकारने दिली होती. आता ती कंपनी या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या भविष्याशी खेळत आहे. शासकीय नोकऱ्याऐवजी खाजगीकरणाची सरकारची भूमिका कठोर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहे.त्यामुळे सरकारने आपल्या भूमिकेचा विचार करावा. संकटात साथ देणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्यावरील अन्याय दूर करून त्यांना कायम सेवेत घ्यावे..अन्यथा वेळ पडल्यास आपण मंत्रालयासमोर देखील आंदोलन करू असा ईशारा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे सर्वेसर्वा संदीप शेळके यांनी दिला. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक डाटा एंट्री ऑपरेटर त्यांच्या मागण्यांसाठी आज संदीप शेळकेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना संदीप शेळके बोलत होते.
सरकारचे खाजगीकरणाचे धोरण एमपीएससी, यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा कशासाठी? एवढं करून त्यांना मिळणार काय तर खाजगी नोकरी.यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होत असल्याचे संदीप शेळके म्हणाले. कोविड काळात कुणी सेवा द्यायला तयार नसतांना जीवावर उदार होऊन राज्यातील ४ हजार डाटा एंट्री ऑपरेटर यांनी काम केले. मात्र ३ वर्षाचा कालावधी पूर्ण व्हायच्या आधीच कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे संदीप शेळके म्हणाले. त्याआधी डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या समस्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या, व तातडीने त्यात लक्ष घालण्याची विनंती केली.