विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जिल्ह्यात! गारपीटीने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी

 
danve

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज,१५ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. प्रामुख्याने खामगाव तालुक्यातील चितोडा येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून वीज पडून मृत्यू पावलेल्या गोपाल कवळे यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे दुपारी छत्रपती संभाजी नगरावरून समृद्धी महामार्गाने खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दुपारी पोहोचतील. तेथे वीज पडून मृत्यू पावलेल्या गोपाल महादेव कवळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन खामगाव तालुक्यासह लगतच्या पट्ट्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करणार आहेत. त्यांच्यासमवेश शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व अन्य सहकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस पडून, वीज पडून एकाचा, तर भिंत पडून चिमुकलीचा मृत्यू झाला होता. सोबतच गारपीट व अवकाळी पावसामुळे काही भागात शेतीचे मोठे नुकसान झाले होते- दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खामगाववरून अकोला, अमरावती व नंतर नागपूर येथे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.