अरे हे काय चाललंय ?बुलडाण्यात वाईनबार चालकाला लाथा बूक्यांनी मारहाण! कारण काय तर...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील खामगाव रोडवरील सोनावाईन बार मध्ये रविवारी रात्री राडा झाला. बार बंद करण्याची वेळ झाली आहे, असे सांगायला गेलेल्या बार चालकालाच तिघांनी लाथा बुक्क्यांनी तुडविले. घटनेची माहिती काल २३ जानेवारीच्या दुपारी हॉटेल चालक अभिषेक भालेराव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आरोपी सतीश गायकवाड व त्याच्या दोन्ही सहकार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना, रविवार २० जानेवारीची आहे. खामगाव रोडवरील सोना वाईन बारमध्ये सतीश गायकवाड नेहमीप्रमाणे बसलेला होता. यावेळी त्याचे दोन मित्रही सोबत होते, रात्रीचे ९: ३० वाजले होते. बार बंद करण्याची वेळ असल्यामुळे बार चालक अभिषेक भालेराव यांनी त्यांच्याकडे जाऊन म्हटले की, "तुम्ही बिल द्या आणि बार बंद करू द्या!" त्यांनतर तिघांनी थोडं थांबण्याची विनंती केली. त्यानुसार भालेराव आतील दरवाजा बंद करून, शटरच्या दिशेने निघाले, तितक्यातच सतीश गायकवाड याने बारचालक अभिषेक भालेराव यांच्या गालावर बुक्का मारला, हातातील बियर बॉटल मारली. त्यामुळे भालेराव जमिनीवर कोसळले. त्यानंतर सतीश गायकवाडच्या सोबत असलेल्या दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरवात केली. भालेराव यांचे खिशातील दहा हजार रुपये सुद्धा त्यांनी काढून घेतले. व तेथून तिघे पसार झाले. असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर अभिषेक भालेराव यांनी भावाला फोन करून बोलावून घेतले, व उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. काल २३ जानेवारीला दुपारी ५:३० वाजता शहर पोलीस ठाण्यात येऊन सगळी हकीकत सांगितली, त्यानुसार सतीश गायकवाड व त्याच्या दोन सहकार्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय दिलीप पवार करत आहेत.