अरेच्च्या! आमचा कोतवाल हरवला हो...!दहा वर्षांपासून गायब; धोत्रा नंदईच्या सरपंचांनी केली तक्रार

 
Bndnd
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील धोत्रा नंदई येथील कोतवाल गेल्या दहा वर्षांपासून गावात आलाच नाही. कोतवाल हरवल्याची तक्रार सरपंच जिजाबाई मुंडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
धोत्रानंदईची सरपंचपदाची जबाबदारी जिजाबाई इंदर मुंडे यांच्याकडे २२ डिसेंबर २०२२ पासून आली. तेव्हापासून आजपर्यंतच्या कार्यकाळात कुठलाही कोतवाल आमच्या गावी शासकीय कार्यक्रमास व अन्य कामकाजासाठी उपस्थित राहिला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. २० सप्टेंबर २०२३ ला देऊळगाव राजा तहसीलदारांनी लेखी पत्र दिले. २१ सप्टेंबर रोजी गावातील कोतवालाच्या आरक्षण सोडतीसाठी हजर राहण्यास कळविले होते. त्यानुसार हजर राहण्याबाबत आम्ही सोडतीसाठी वेळेवर हजर राहिलो. तेव्हा तहसीलदारांनी सांगितले की, तुमच्या गावाला २०१३ पासून बुरकूल कोतवाल देण्यात आले आहे. त्यामुळे सोडती रद्द करण्यात आली. २०१३ पासून कोतवाल दिला तर तो गावात कधीच आला कसा नाही? तो कोण आहे, त्याला कुणीच पाहिले नाही. शासनाने दिलेला कोतवाल केवळ कागदोपत्रीच कार्यरत आहे. त्याचा पगार निघत आहे, वेळेवर कोतवाल आरक्षण रद्द झाले. त्यामुळे सध्या महसूल विभागात चाललंय तरी काय? असे अनेक प्रश्न सरपंचांनी प्रशासनाला विचारले आहेत.
महसूल प्रशासनाच्या अजब कारभाराची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.