आता जनतेच्या संयमाचा बांध सुटलाय! फसवेगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधिंना जनता धडा शिकवेल; वानखेड येथील सभेत संदीप शेळके यांचा घणाघात! संग्रामपूरात परिवर्तन रथयात्रेला भरघोस प्रतिसाद

 
संग्रामपूर
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकशाहीने आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. आमच्या गल्लीचा, गावाचा विचार दिल्लीत व्हावा असे आम्हाला वाटले पण दिल्लीत जाऊन लोकप्रतिनिधींनी त्यांचाच विचार केला. राजकारणाला जनकल्याणाचे साधन मानण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थाचे साधन मानणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आता जनतेच्या संयमाचा बांध सुटला आहे असे घणाघाती प्रतिपादन वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी केले. वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा सध्या संग्रामपूर तालुक्यात आहे. काल, सायंकाळी वानखेड येथे झालेल्या सभेत संदीप शेळके बोलत होते.
 पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, बुलडाणा जिल्हा सर्वांगसुंदर व्हावा असे कुणाला वाटत नाही? भौगोलिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यात खूप काही वाव आहे, मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जिल्ह्याचा विकास रखडला असल्याचे ते म्हणाले. जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर आमच्या जिल्ह्यात आहे मात्र तरीही पर्यटकांची पावले लोणारकडे का वळत नाहीत? कारण अजूनही पायाभूत सुविधा आम्ही निर्माण करू शकलो नाही असे संदीप शेळके म्हणाले. ३० - ३० वर्षे सत्ता उपभोगून देखील इथल्या खासदार आमदारांना जिल्ह्याचा विकास करता येत नसेल तर त्यांना आता जनतेने अद्दल घडवली पाहिजे..जनतेला गृहीत धरल्यास काय होते हे लोकप्रतिनिधींना कळले पाहिजे असे संदीप शेळके म्हणाले.
   आगामी निवडणूक महत्वाची..!
आता येणारी लोकसभा निवडणूक जिल्ह्याचा भाग्योदय घडवणारी असणार आहे . राजकारणाला मिशन समजून आपण काम करत असून जनतेने संधी दिल्यास खासदार म्हणून नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करणार असल्याचा निर्धार यावेळी शेळके यांनी बोलून दाखवला. संग्रामपूर तालुक्यात अनेक समस्या आहेत, मात्र दुर्गम भाग म्हणून या भागाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले, इथेही माणसेच राहतात हो..जरा आमचाही विचार करा असे संदीप शेळके प्रस्थापित पुढाऱ्यांना उद्देशून म्हणाले. आता आपला विकास आपल्या हाती आहे. जिल्ह्यात परिवर्तनाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणायची आहे, नदीजोड प्रकल्प, प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, उच्च दर्जाचे शिक्षण, महिला सक्षमीकरण, सिंचनाची सोय या गोष्टी आपल्या अजेंड्यावर असल्याचे संदीप शेळके म्हणाले.
  संग्रामपूर तालुक्यात भरघोस प्रतिसाद..!
दरम्यान गेल्या ३ दिवसांपासून वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला संग्रामपूर तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. संग्रामपूरात झालेला महिला मेळावा, संग्रामपूर ते सोनाळा मोटारसायकल रॅली, टूनकी, बावणबिर, वरवट खंडेराव, आवार, पातुर्डा, सागोडा गावांत झालेल्या सभा परिवर्तनाचे संकेत देणाऱ्या ठरल्या.