बुलडाणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! येळगाव धरणात एक महिना पुरेल एवढाच जलसाठा; घाटाखाली पावसाचे थैमान पण घाटावर थेंबा थेंबा साठी तरसायला लावतोय..

 
talav

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लाखावर लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहराची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यात घाटाखालच्या तालुक्यांत पावसाने थैमान घातले, ते एवढे की शेकडो कुटुंब रस्त्यावर आली, २०३ पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला. जवळपास १ लाख हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. घाटाखाली पावसाने एवढे रौद्ररूप दाखवत गरजेपेक्षा जास्त बरसला असला तरी घाटावर मात्र गरजेएवढाही पाऊस बरसला नाही.  बुलडाणा शहराची तहान भागविणाऱ्या येलगाव जलाशयात आता केवळ एक महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे.

मढ येथून उगम पावणाऱ्या पैनगंगा नदीवर येळगावचे धरण बांधण्यात आले आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत धरण १०० टक्के भरले होते. यंदा मात्र धरणात पाण्याची आवकच झाली नाही, त्यामुळे गेल्यावर्षीच्या पाण्यावर बुलडाणा शहरातील नागरिकांची तहान भागावने सुरू आहे. त्यामुळे धरणात होते तेही पाणी आता संपत चालले असून या महिन्यात पाऊस पडलाच नाही तर सध्याचे पाणी केवळ सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल असा अंदाज आहे.
    आज १० ऑगस्ट पर्यंत बुलडाणा तालुक्यात केवळ २७ टक्के पावसाची नोंद आहे. झालेला पाऊसही रिमझिम व मध्यम स्वरूपाचा होता त्यामुळे नद्या नाल्यांना पुर आला नाही. त्यामुळे येळगाव जलाशयात पाणी आले नाही. आता येळगाव धरणात केवळ १३ टक्के एवढे पाणीसाठा आहे.  त्यामुळे बुलडाणेकरांनो जरा जपूनच वापरा पाणी....!!