जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी बातमी; आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत 'भूमिपुत्रांचा' डंका! उपजिल्हाधिकारी वऱ्हाडे, डॉ वाघ, यांच्यासह तिघांचा सहभाग..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) 
जिल्हा वासियांची मान अभिमानाने उंचावणारी बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेतील ८५.९१ किलोमीटरच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये बुलढाण्याच्या पाच सुपुत्रांनी सहभाग  नोंदविला. अतिशय खडतर असणारी ही स्पर्धा वेळेत पूर्ण केली
 उच्चशिक्षित व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मूळ बुलढाण्याच्या या खेळाडूंची कामगिरी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील नामांकित आणि खडतर स्पर्धा आहे. ही स्पर्धा पूर्ण करतांना खेळाडूंचा कस लागतो. स्पर्धेत सहभागी होऊन वेळेत स्पर्धा पूर्ण करणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्याकरिता खेळाडू कठोर  मेहनत घेतात. यावर्षी ९ जून रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा झाली. डर्बन येथून सुरू झालेली मॅरेथॉन पीटरमेरीटबर्ग शहरात संपली. यावर्षीचा अप रन होता. एक वर्षी डाउन रन आणि एक वर्षी अप रन असतो. 

यावर्षीचे अंतर ८५.९१ किमी होते. ७४ हुन अधिक देशातील २२००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 
३६६ भारतीय स्पर्धक होते. सदर स्पर्धा १२ तासांच्या आत पूर्ण करावी लागते. त्यासाठी  गेली सहा महिने जिल्ह्यातील  सर्व स्पर्धकांनी अतिशय कठोर मेहनत घेतली. आपल्या यशाचे श्रेय ते कुटुंबीय आणि रनिंगसाठी मदत करणाऱ्या सर्व मित्रांना देतात.

जिल्ह्याच्या सुपुत्रांनी अशी नोंदवली कामगिरी! 

बुलढाणा येथील संतोष जाधव यांनी रेकॉर्ड टायमिंगमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. भारतीय स्पर्धकांमध्ये टॉप टेनमध्ये राहत सातव्या क्रमांकावर आले. त्यांनी ८:४७:३० तासांत ही स्पर्धा पूर्ण केली. मूळचे नांद्राकोळी येथील आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक असलेले प्रशांत राऊत यांनी ही स्पर्धा ११:२२:४२ तासांत पूर्ण केली. बुलढाणा येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. विजय वाघ यांनी ही स्पर्धा ११ः३३ः२८ तासांत पूर्ण केली. तर चिखली येथील महेश महाजन यांनी ११ः५३ः४८ तासांत स्पर्धा पूर्ण केली. 

उपजिल्हाधिकारी वऱ्हाडेंचा सलग दुसऱ्या वर्षी सहभाग

देऊळगाव माळी गावचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी १०:४१:२५ तासांत ही स्पर्धा पूर्ण केली. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले. गतवर्षीपेक्षा कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करीत त्यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा केली. उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांची स्पोर्ट पर्सन म्हणून ओळख आहे.  अत्यंत व्यस्त शेड्युलमध्ये सुद्धा त्यांनी आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवला आहे. रनिंगशिवाय क्रिकेट,खो-खो व्हॉलीबाल, सायकलिंगची त्यांना विशेष आवड आहे. सध्या ते नांदेड येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.