चिमुकली हत्याकांड प्रकरणात नवे अपडेट! नराधम सद्या रोडगे ची बुलडाणा कारागृहात रवानगी; तपास अधिकारी विलास यामावारांनी सांगितला पुढचा प्लॅन..

 
fgh
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील रोहडा येथील तपोवन देवी संस्थान परिसरात १२ मे रोजी राज्याला हादरवून सोडणारे हत्याकांड घडले होते. ६ वर्षीय चिमुकलीची मंदीर परिसरात पूजेचे साहित्य विकणाऱ्या सदानंद रोडगे या हैवानाने हत्या केली होती, त्याआधी तिच्यावर बलात्कार केला होता. घटनेच्या ४  ते ५ दिवसांत पोलिसांनी या आव्हानात्मक प्रकरणाचा तपास करून सद्या रोडगे ला अटक केली होती. आता या प्रकरणात महत्वाचे अपडेट समोर आले आहे.
 

१२ मे रोजी सकाळी ११ वाजता चिमुकली मंदिर परिसरातून बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी १३ मे रोजी मंदिराच्या मागील बाजूच्या डोंगरावर दगडाच्या पाळी खाली चिमुकलीचा मृतदेह सापडला होता. चिमुकलीवर बलात्कार करून नंतर रुमालाने गळा आवळून तिचा खून केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी चेहऱ्यावर असलेल्या जखमेच्या संशयावरून सद्या रोडगे याला ताब्यात घेतले होते. सद्या आधी ते दाढी करतांना ब्लेड लागल्याचे सांगत होता मात्र दाढी करणाऱ्याने ते निशाण ब्लेडचे नसल्याचे सांगितले होते. पोलिसांच्या संशय वाढल्याने पोलिसांनी डॉक्टरांकडून तपासणी केली आणि आणि ते निशाण नखांचे असल्याचे समोर आले, नंतर पोलिसी हिसका दाखविल्यानंतर सद्या ने गुन्ह्याची कबुली दिली होती. १७ मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी पत्रकार परिषद घेत आरोपी सद्या रोडगे याला अटक केल्याची माहिती दिली होती.

  पोलिस कोठडीनंतर जेलात रवानगी..!

    अटकेनंतर पोलिसांना  सद्या रोडगेचा आधी ३ आणि नंतर २ दिवसांचा पीसीआर मिळाला होता. तपासात सद्या ने घटनेचा क्रम पोलिसांना सांगितला, मात्र याशिवाय तो फारसा काही बोलला नाही. सद्या या प्रकरणात एकटाच आरोपी आहे की त्याला कुणी साथीदार यावर "सध्यातरी" सद्या  एकटाच आरोपी असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा प्रकरणाचे तपास अधिकारी विलास यामावर यांनी सांगितले. पीसीआर दरम्यान पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित पुरावे जमा केले आहेत, ज्यात सद्या चा मोबाईल, घटनेच्या दिवशी घातलेले कपडे,  ज्या रुमालाने हत्या केली तो रुमाल याचा समावेश आहे. काल,२३ मे रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. लवकरात लवकर तपास पूर्ण करून सगळे पुरावे व साक्षीदार जमा करून दोषारोपपत्र  दाखल करण्यात येईल, कोर्टात प्रभावीपणे पोलिसांची बाजू मांडण्यात येईल असा पुढचा प्लॅन असल्याचे तपास अधिकारी विलास यामावार म्हणाले.