नारीशक्तीच्या सहभागाने 'न्यू होम मिनिस्टर' सुपरहिट ! उत्साह, संगीत, हास्याच्या फवाऱ्यांनी शारदा कॉन्व्हेंटचे मैदान चिंब

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि धनिक एडव्हायझर्सच्या संयुक्त विद्यमाने २९ जानेवारी रोजी आयोजित सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला बुलढाणेकर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेत मंचावरील विविध स्पर्धेत भरभरुन सहभाग नोंदवला. महिलांचा उत्साह आणि संगिताच्या स्वरांनी शारदा कॉन्व्हेंटचे मैदान चिंब झाले. 
Women
येथील शारदा कॉन्व्हेंटच्या मैदानावर सोमवारी सायंकाळी खास महिलांसाठी हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालती शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांनी उपस्थित महिलांशी हसतखेळत संवाद साधत कार्यक्रमात रंगत आणली. चिमुकल्या सह्याद्री मळेगावकर हिने त्यांना उत्तम साथ दिली. कधीच कुठल्या स्टेजवर गेल्या नसतील अशा महिलांनी भरभरून सहभाग घेतला. खेळ, मनोरंजन, हास्य, गप्पा, प्रश्न-उत्तरे, मनमोकळा संवाद असा कार्यक्रम रंगला होता. 
Women
गतवर्षी न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी महिलांनी केली होती. त्यानुसार राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालती शेळके यांनी यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन केले. महिलांनी भरभरुन दाद देत मनसोक्त आनंद घेतला. वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाची लोकचळवळ असून माता-भगिनींनी आशीर्वाद द्यावे, असे आवाहन संदीप शेळके यांनी केले. प्रपंच सांभाळत असतांना महिलांना स्वतः कडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या माध्यमातून जिल्हयातील महिलांसाठी नियमित असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, अशी ग्वाही मालती शेळके यांनी दिली. 
ह्या आहेत बक्षिसांच्या मानकरी
क्रांतीनाना मळेगावकर यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये न्यू होम मिनिस्टर... खेळ पैठणीचा कार्यक्रमात बुलढाणेकर महिलांना सहभागी करून घेतले. हसतखेळत विविध खेळात महिलांनी भरभरुन सहभाग नोंदवला. प्राजक्ता काशीकर यांनी फ्रीज हे प्रथम बक्षीस पटकावले. द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन राधा चिंचोळकर यांना तर मोहिनी मिसाळकर यांनी तृतीय क्रमांकाचे एलईडी हे बक्षीस पटकावले. सहभागी प्रत्येक महिलेस आरोग्यमय भेटवस्तू देण्यात आली. अत्यंत सुंदर आयोजन करण्यात आल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या.