राष्ट्रवादी पदाधिकारी दोन पत्रकारांना म्हणाला, हायपाय तोडून टाकेन!; मलकापूरमध्ये गुन्हा दाखल, एसपींसह पालकमंत्र्यांना पत्रकारांनी दिले निवेदन!!
२५ डिसेंबरला मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसील प्रशासनाने अवैध बायोडिझेलच्या कारखान्यावर छापेमारी केली होती. यासंदर्भात बायोडिझल विक्रेत्यावर काय कारवाई झाली, याची विचारणा करण्यासाठी मलकापूर येथील पत्रकार गजानन ठोसर व बुलडाणा येथील एका टीव्ही वाहिनीचे पत्रकार वसीम शेख यांनी मलकापूरच्या तहसीलदारांना विचारणा केली होती. त्यावर प्रयोगशाळेतील बायोडिझेल नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली होती.
त्यानंतर काल, ६ जानेवारी रोजी मलकापूर येथील अवैध बायोडिझेल विक्रेता इफ्तेखार खान याने गजानन ठोसर व वसीम शेख यांना फोन वरून हात-पाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी काल रात्री उशिरा गजानन ठोसर यांच्या तक्रारीवरून इफ्तेखार खान याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
जिल्हाभरातील पत्रकारांना याबाबत कळताच सर्वच पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे. आज जिल्हाभरातील पत्रकारांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. शिंगणे यांची भेट घेतली. धमकी देणाऱ्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंर्तगत कारवाई करण्याची व अटकेची मागणी केली. यावर संध्याकाळी ७ पर्यंत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.