जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी नंदकिशोर येसकर, तीन पदाधिकाऱ्यांची अविरोध निवड

 
बुलढाणा
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: बुलढाणा जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह तीन पदाधिकाऱ्यांची अविरोध निवड कऱण्यात आली. अध्यक्षपदी कर्मचारी नेते नंदकिशोर येसकर, सचिवपदी मिलिंद पाटील तर उपाध्यक्षपदी सदानंद पिसे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
   जिल्हा उप निबंधक कार्यालयात पार पडलेल्या सभेचे निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक अनिल खंडारे हे होते. यावेळी तिन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने अनिल खंडारे यांनी निवडणूक अविरोध झाल्याचे जाहीर झाले. निवडणूक अविरोध पार पाडण्यासाठी कर्मचारी नेते किशोर हटकर, अजय पिंपरकर, श्रीराम सोळंके आदींनी प्रयत्न केले.
 या निवडीत व त्यापूर्वी झालेल्या निवडणूकीत देखील महसूल कर्मचाऱ्यांची एकजूट दिसून आली होती. एकूण १५ संचालकांच्या जागासाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र संघर्ष टाळण्यासाठी व महसूल संघटनेची एकजूट कायम ठेवण्यासाठी काही इच्छुकांनी माघार घेतल्याने सर्व १३ जागा अविरोध निवडून आल्या. दोन जागा रिक्त राहिल्या असून त्यासाठी लवकरच पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पाठोपाठ तीन प्रमुख पदांची निवड अविरोध झाली आहे.   
    दरम्यान निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचारी, संघटनेची एकजूट कायम ठेवून आपण पतसंस्थेच्या प्रगतीसाठी झटणार असल्याचे नूतन अध्यक्ष येसकर यांनी सांगितले.