शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नंदकिशोर मापारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात! शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्याची मागणी;

२२० केव्ही चे सबस्टेशन चे काम तात्काळ सुरू करा,शेतकऱ्यांना रब्बी हंगामात त्रास देऊ नका म्हणाले....

 
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदा शेतकऱ्यांना खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन आले नाही. आता गोरगरीब शेतकऱ्यांची सारी आशा रब्बीवर टिकून आहे. मात्र वीज वितरण कंपनीच्या कारभाराला शेतकरी वैतागला आहे. लोणार साठी २२० केव्ही चे सबस्टेशन मंजुर झाले आहे. परंतु अजून त्याचे काम सुरू झाले नाही. ते तातडीने सुरू झाले तर लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न निकाली निघेल त्यामुळे त्याचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी शिवछत्रपती मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी केली.
 

लोणार तालुक्यातील शारा, वझर, गंधारी , आघाव, चिंचोली सांगळे या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा नंदकिशोर मापारी यांच्याजवळ मांडल्यानंतर नंदकिशोर मापारी यांनी  कंपनीचे कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला. देऊळगाव कुंडपाळ, सरस्वती, अंजनी या गावात ३३ केव्ही चे उपकेंद्र तात्काळ सुरू करा. टिटवी, देऊळगाव कुंडपाळ, किनगाव जट्टू, सुलतानपूर या ठिकाणी नवीन पावर ट्रान्सफॉर्मर सुरू करावे अशी मागणीही नंदकिशोर मापारी यांनी केली. लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज द्या, रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास देऊ नका असेही यावेळी नंदकिशोर मापारी म्हणाले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते..